पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला
‘पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल‘ येथे दि.१४ जानेवारी ते दि.२८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा‘ उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी-शुद्धलेखन, इयत्ता सहावी-कथाकथन, इयत्ता सातवी-शब्दकोडी सोडवणे, इयत्ता आठवी- हस्ताक्षर स्पर्धा, इयत्ता नववी- घोषवाक्य/चारोळी/काव्यलेखन असे विविध उपक्रम या पंधरवड्यात विद्यालयात राबवले गेले. सगळ्याच उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि मराठी विषय शिक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आला. दि. २७ जानेवारी रोजी शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ कविता अभिवाचन स्पर्धा‘ आयोजित करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या अभिवाचन स्पर्धेसाठी ‘ मराठी साहित्यातील देशभक्तिपर कविता‘ असा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘योग्य ती कविता निवडून तिचे अभिवाचन कसे करावे‘ याबाबत शाळेच्या मराठी विषय शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. अभिवाचनासाठी कविता निवडण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनालयातील कवितासंग्रह घेतले, त्यातून कविता शोधल्या आणि त्या कविता स्पर्धेत उत्कृष्ट प्रकारे सादर केल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. एकूणच मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने टाकलेले हे आश्वासक पाऊल हे उपक्रमाचे उद्दिष्ट सफल करणारे ठरले!














