‘मराठी राजभाषा दिन’
आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून दणक्यात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका मधुवंती सप्रे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यजमानपद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना सहस्रबुद्धे आणि उपमुख्याध्यापिका सौ.स्मिता बिवलकर यांनी भूषवले.विद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे वर्षभर आयोजित केलेल्या निबंधलेखन, काव्यपूर्ती ,एकपात्री अभिनय, काव्यपठण अशा विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
विद्यालयातील मराठी विषय शिक्षिका सौ.अन्वया काणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘प्रवास कवितेचा’ हा उत्कृष्ट कार्यक्रम याप्रसंगी सादर करण्यात आला.या कार्यक्रमाचे लेखन,दिग्दर्शन सौ.अन्वया काणे यांचे असून दिग्दर्शन साहाय्य सौ. वृषाली वीरकर आणि सौ.सुखदा जोगळेकर या शिक्षिकांनी केले.१२ व्या शतकापासून ते आजपर्यंत मराठी कवितेचे बदलत गेलेले रूप,कवितांचे विविध प्रकार ,उत्तमोत्तम कवी कवयित्रींचे मराठी साहित्यातील योगदान अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या तब्बल ५० विद्यार्थ्यांनी अतिशय देखणा प्रयोग सादर करत ही संकल्पना प्रत्यक्ष साकारली. अभंग,ओवी,भारुड,श्लोक,पोवाडा, वृत्तबद्ध कविता,मुक्तछंदात्मक कविता,सामाजिक कविता,बालकविता अशा मराठी कवितेच्या विविध प्रकारांचे मनोहर दर्शन यानिमित्ताने विद्यार्थ्यांना घडले.विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यावर आधारित असा उत्तम कार्यक्रम सादर करणे ही बाब उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरली.’मुलांचे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरी आपल्या मायबोलीची आवड मुलांच्या मनात अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनातून निर्माण करता येते’ असा संदेश देत मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासक चित्रच जणू पार्ले टिळक विद्यालयाने या दर्जेदार कार्यक्रमातून उभे केले.





