Manache Shlok
पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिनांक २५-८-२५ रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशकथा आणि संत रामदास यांच्या ‘मनाचे श्लोक‘ या विषयावरील कथा याद्वारे उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय कीर्तनकार , लेखिका, निवेदिका आणि गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती प्रणाली पटवर्धन लाभल्या होत्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता बिवलकर यांनी पुस्तकरुपी भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुण्यांची ओळख शाळेच्या मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया काणे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. गणपतीच्या कथेद्वारे कठीण वाटणारी कोणतीही गोष्ट सरावाने साध्य करता येते हा कानमंत्रच जणू त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच मनाच्या श्लोकांच्या निर्मितीमागील कथा सांगून आजच्या काळात मनाच्या श्लोकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कथा सादरीकरणाचा उत्तम धडा यातून विद्यार्थ्यांना मिळाला तसेच सराव, स्वयंशिस्त , चांगली वागणूक या गोष्टींचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजले.









