पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला

पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला

दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी मा.संकेत म्हात्रे उपस्थित होते. विद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे वर्षभर आयोजित केलेल्या कथाकथन ,निबंधलेखन, काव्यपूर्ती,एकपात्री अभिनय ,कविता अभिवाचन अशा विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील ‘मराठी राजभाषा दिन’ हा दुग्धशर्करा योग साधत मराठी कवींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान विशद करणारा ‘ गाऊ त्यांना आरती’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात   एकपात्री अभिनय स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाने झाली .सूत्रबद्ध निवेदन आणि दिग्गज कवींच्या कवितांचे उत्तम सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या आणि उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.

कार्यक्रमाचा आदला दिवस म्हणजेच दि.२६ फेब्रुवारी ही जहाल विचारांचे क्रांतिकारक आणि हळव्या मनाचे कवी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी; त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचे ‘जयोस्तुते‘ हे गीत सादर करण्यात आले.  कविवर्य कुसुमाग्रजांनी रचलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे श्री. संकेत म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुले असूनही सर्वजण किती अस्खलित मराठी बोलत आहेत हे पाहून मला आनंद वाटला” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक केले.

 प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले आणि’ मराठी भाषा आपली मातृभाषा आहे हे आपले भाग्यच आहे’ असे सांगणारे  ‘लाभले आम्हांस भाग्य ‘हे कवी सुरेश भट यांनी रचलेले गीत  त्यांनी विद्यार्थ्यांसह गायले.

कार्यक्रमाच्या शेवटी राजा बढे लिखित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.

एकंदरीत आजचा मराठी राजभाषा दिन हा विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी नवी ऊर्जा देऊन गेला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow