मराठी भाषा गौरव दिन
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका छाया पिंगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता बिवलकर यांनी भूषवले. शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिके याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यानंतर ‘ लाभले आम्हांस भाग्य…‘ हा कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी भाषेतील अनेक कवितांचे आणि गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यातील काही कविता
मराठी भाषेतील गमतीजमती उलगडून दाखवणाऱ्या तर काही कविता मराठी भाषेची महती सांगणाऱ्या होत्या. विद्यार्थ्यांनी केलेले प्रत्येक कवितेचे साभिनय आणि सचित्र सादरीकरण तसेच आत्मविश्वासपूर्ण संवादात्मक निवेदन यामुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला.
कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी इंग्रजी माध्यमात शिकत असूनही इतक्या मराठी कविता समजून घेऊन त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आणि त्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे काही भाषिक खेळही त्यांनी घेतले. मुलांनी या खेळांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , पाहुण्यांची ओळख , बक्षीस वितरण, आभारप्रदर्शन अशा सर्वच जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व मराठी विषय शिक्षिकांच्या साहाय्याने उत्तम प्रकारे पार पाडल्या.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या मराठी भाषेच्या श्रीमंतीची नव्याने जाणीव झाली आणि त्यांच्या मनातला आपल्या समृध्द मराठी भाषेबद्दलचा अभिमान दुणावला.













