Guru Purnima

Guru Purnima

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम, माध्यमिक विभागामध्ये आज अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने गुरुपौर्णिमा साजरी झाली. शाळेच्या शिक्षिका डॉ. विज्ञापना गोकर्णकर यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. गुरुचे महत्त्व सांगणारे एक सुंदर गाणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुंदर आवाजात आणि त्यांनी वाजवलेल्या वाद्यांच्या साथीत अत्यंत आदराने आणि सुरातालात पार पडले. चित्रकलेचे शिक्षक गीतांजली महाले आणि विठ्ठल चव्हाण यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने फलक सजावट केली.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व –

आज आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस. संपूर्ण विश्वातील सर्व गुरूंना वंदन करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

महर्षी व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र. त्यांनी चारही वेदांचे संकलन करून त्यांचे विभागीकरण केले आणि ज्ञानाची अखंड परंपरा जतन केली. म्हणूनच त्यांना वेदव्यास असे संबोधले जाते. व्यासांनी महाभारत या आर्ष महाकाव्याची निर्मिती केली. एवढेच नव्हे, तर अठरा पुराणांची रचना करून ज्ञानाचे अमूल्य भांडार संपूर्ण मानवजातीसाठी खुले केले.

महर्षी व्यास यांची बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि ज्ञान अफाट होते. त्यांच्या ज्ञानाचा गौरव म्हणूनच आजही वक्त्याच्या आसनाला व्यासपीठ असे म्हटले जाते.

व्यासांसारखे अनेक गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवत असतात. आपली आई ही आपली पहिली गुरु. बोट धरून चालायला शिकवणारे आई-वडील, मुळाक्षरांचे ज्ञान देणारे शिक्षक, तसेच कला, क्रीडा, संगीत आणि विविध क्षेत्रांत मार्गदर्शन करणारे सर्वजण आपले गुरुच होत. प्रेमाने, आत्मीयतेने आणि कौशल्याने आपल्याला घडवणाऱ्या त्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

जसे लौकिक जीवनात गुरु असतात, तसेच अध्यात्माच्या क्षेत्रातही आपल्या भारतीय परंपरेत अनेक महान गुरु होऊन गेले. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे हे गुरु सर्वश्रेष्ठ मानले जातात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात—

“गुरु हा संतकुळीचा राजा ।

गुरु हा प्राणविसावा माझा ॥”

श्रीनिवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे गुरु, जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु, विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु. संत बहिणाबाई म्हणतात—

“तुकाराम माझे गुरु, रानावनांतही सोबती.”

श्रीकृष्ण–अर्जुन, वसिष्ठ–श्रीराम, सांदीपनी–श्रीकृष्ण यांच्यापासून सुरू झालेली ही गुरु-शिष्य परंपरा आधुनिक काळातही अखंडपणे सुरू आहे. श्रीरामकृष्ण परमहंस–स्वामी विवेकानंद, रमाकांत आचरेकर–सचिन तेंडुलकर, पंडित रविशंकर–अनुष्का शंकर, किशोरी आमोणकर–रघुनंदन पणशीकर अशा अनेक गुरु-शिष्य जोड्यांनी ही परंपरा समृद्ध केली आहे.

गुरु आपल्या मनात ज्ञानाची निर्मिती करतो, म्हणून गुरुर्ब्रह्मा. ज्ञानाचे रक्षण करून जीवनात धैर्य देतो, म्हणून गुरुर्विष्णुः. आणि अज्ञान, संकुचित वृत्ती व वाईट विचारांचा नाश करतो, म्हणून गुरुर्देवो महेश्वरः.

अशा या गुरूंना त्रिवार वंदन! ज्याला कोणी गुरु नाही, त्याचा गुरु भगवान श्रीकृष्ण. म्हणूनच श्रीकृष्णांना जगद्गुरु असे म्हटले जाते.

गुरूच्या स्पर्शाने आयुष्य उजळून निघते. गुरू माऊलीप्रमाणे आपल्या शिष्याला जपतो. गुरुस्मरणाने चित्तशुद्धी होते, शुद्ध बुद्धी प्राप्त होते आणि अंतःकरणातील दिव्यत्वाची अनुभूती येते.

अशा या पूज्य गुरुजनांना आपण सर्वजण विनम्र मानवंदना अर्पण करूया…

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow