पासष्टावी कला

पासष्टावी कला

अर्धा श्रावण आटोपला की मराठी घरांत “यंदा गणपतीची सजावट कशी करायची” या आवर्ती चर्चेला सुरुवात होते. या वर्षी कोरोनाची भेसूर छाया उत्सवावर पसरलेली असली तरी मराठीजनांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. सजावटिचं आकर्षक सामान बाजारात उपलब्ध तर आहे, पण सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका पत्करून ते सगळं घरी आणावं का, असा प्रश्न अनेक कुटुंबांसारखाच देवरुखकरांच्या घरात ही पडलेला. अशा वेळी गणेश आणि ईशा देवरुखकर या दाम्पत्याला एक अभिनव कल्पना सुचली. स्वतःची १२ वर्षांची मुलगी, सिया हिची शाळा, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रस्तरावर मिळवलेली पारितोषिकं वापरून गणपतीची आरास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘सिया देवरुखकर’ हे स्विमिंग या क्रीडाप्रकारातलं उगवतं नाव. आजवर स्विमिंगच्या अनेक स्पर्धात भाग घेऊन सियाने असंख्य पारितोषिकं मिळवली आहेत. इतकी की, आता एवढ्यातच मेडल्स आणि ट्रॉफीज ठेवायला घरात जागा उरली नाही. सिया एखाद्या स्पर्धेला गेली आणि बक्षिस आणलं नाही असं होत नाही. तिने मिळवलेली बक्षिसं वापरूनच ही सुंदर आरास केली आहे. आणि इतकं करूनही अजून बरीच बक्षिसं बाकी आहेत. अशा युनिक सजावटीमधे बसलेला देवरुखकरांचा बाप्पा सुद्धा कौतुकाने सियाच्या यशाकडे बघत असेल एवढं नक्की. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेला गणराज, विसर्जनाच्या दिवशी सियाच्या कानात नक्की विचारून जाईल,
“सिया, ही पासष्टावी कला मला शिकवशील का?”

सिया, तुझ्या यशाचा आलेख असाच चढा राहो आणि दर वर्षी तुझ्या बाप्पाच्या सजावटीचा आकार अजून अजून वाढत राहो, याच शुभेच्छा.

।। गणपती बाप्पा मोरया ।।

  • By Omkar Mokal

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow